मुलांना समजदार करायचे आहे ? मग, चार मिनिटे वेळ काढून वाचा !

मुलांना समजदार करायचे आहे ?
मग, चार मिनिटे वेळ काढून वाचा !

एका गावात असाच एक दुकानदार असतो. त्याचा मुलगाही खूप आळशी असतो. त्याचा आळस घालवून त्याने दुकानात लक्ष घालावे म्हणून दुकानदार एक आयडिया करतो.

तो एके सकाळी मुलाला म्हणतो, "आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण, नाहीतर संध्याकाळचे जेवण मिळणार नाही."

मुलगा दचकतो. कारण कामाची, कमाईची अशी वेळ आलेली नसते. तो रडक्या चेहऱ्याने आईकडे जातो. वडीलांनी काय सांगितलेय तेही सांगतो. त्याचा रडका चेहरा पाहून आईला दया येते. ती तिच्याजवळची शंभरची नोट काढून त्याला देते आणि म्हणते की, हीच संध्याकाळी वडीलांना दे"

त्याप्रमाणे संध्याकाळी मुलगा ती नोट वडीलांना देतो. वडील ते पाहून हसतात. म्हणतात, "ठीकाय. आता ही नोट घरासमोरच्या कचरा कुंडीत टाकून ये".

मुलगा त्याप्रमाणे ती नोट कचरा कुंडीत टाकून येतो.

दुसऱ्या दिवशी दुकानदार आपल्या बायकोला माहेरी पाठवतो. आणि मुलाला पुन्हा सांगतो, "आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण, नाहीतर संध्याकाळचे जेवण मिळणार नाही."

आता आई तर घरी नसते. मग तो आळशी मुलगा मोठ्या बहिणीकडे जातो. तिलाही त्याची दया येते. ती तिच्याजवळची पन्नास रुपयाची नोट त्याला देते.

ती घेऊन संध्याकाळी मुलगा परत वडीलांना "आजची कमाई" म्हणून देतो. वडील नोट निरखून पाहून हसतात. मुलाला म्हणतात, ""ठीकाय. आता ही नोट घरासमोरच्या कचरा कुंडीत टाकून ये".

मुलगा त्याप्रमाणे ती नोट कचरा कुंडीत टाकून येतो.

दुकानदार वडील तिसऱ्या दिवशी मोठ्या मुलीला मैत्रिणीकडे राहायला पाठवतात. आणि मुलाला पुन्हा सांगतात, "आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण,"

आता मात्र मुलाची पंचाईत होते. शेवटी नाईलाजाने तो मार्केटमध्ये जातो. तिथे धान्याची पोती ट्रक मधून उतरवण्याचे काम सुरू असते.
हा मुलगा तिथे जाऊन ते काम नाईलाजाने करतो.
तिथला मालक याला त्याबद्दल दहा रुपये देतो. ते घेऊन मुलगा घरी येतो. दहाची नोट वडीलांना देतो. पुन्हा वडील म्हणतात, "ठीकाय. आता ही नोट घरासमोरच्या कचरा कुंडीत टाकून ये".

यावर मात्र मुलगा रागावतो. वडीलांना म्हणतो, "मी इतके कष्ट करून दहा रुपये आणलेत, तुम्ही ते कचऱ्यात टाकायला सांगताय? मी नाही टाकणार !!"

हसत हसत वडील म्हणाले, "हेच तर तुला शिकवायचे होते.

शंभरची, पन्नासची नोट तू सहज कचऱ्यात टाकलीस, आयते मिळालेल्या जास्त पैशाची किंमत नव्हती पण दहाची छोटी नोट टाकायला जीवावर आले.

का ?
तर ते तू स्वतः कमावून आणल्याने त्याची किंमत तुला होती. "

असे बोलून दुकानदार दुकानाच्या चाव्या मुलाकडे देतो व म्हणतो, "आता उद्यापासून तू दुकानांत जाऊन बसू शकतोस. तूच आता मालक"

तात्पर्य :-
मुलगा आपलाच असला तरी त्याचे लाड किती करायचे आणि प्रसंगी कठोर होऊन त्याला जीवनाचे धडे कसे द्यायचे? हे सर्वस्वी पालकांच्या हातात असते.

"करेल आज ना उद्या तो चांगले काहीतरी" असे म्हणून उपयोग नाही. कारण "आज" एकदा का हातून गेला कि तो पुन्हा येत नाही. आणि मग ज्याचा "आज" वाया जातो त्याचा "उद्या" देखील फारसा सुखावह नसतो.

म्हणून घडवण्याच्या कामाला मुहूर्त नसतो.
जब जागो तब सवेरा.
हेच खरे

Comments